महानगरपालिका शाळेतून जागतिक दर्जाच्या शिक्षणाकडे; लिबर्टी गार्डनमध्ये नव्या युगाची सुरुवात

महानगरपालिका शाळेतून जागतिक दर्जाच्या शिक्षणाकडे; लिबर्टी गार्डनमध्ये नव्या युगाची सुरुवात

पियूष गोयल यांच्या हस्ते मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण; मालाडला मिळाली जागतिक दर्जाची महानगरपालिका शाळा

मुंबई विशेष प्रतिनिधी सौ.रूपाली बैसाणे .

मुंबई, दि. २१ : उत्तर मुंबईच्या शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मालाड (पश्चिम) येथील मुंबई पब्लिक स्कूल (लिबर्टी गार्डन) या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार मा. श्री. पियूष गोयल यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुमारे ₹३५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही आधुनिक शाळा महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचे प्रतीक मानली जात आहे.

या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अस्लम शेख, सभागृह नेते गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी, स्थापत्य समिती अध्यक्षा संगीत ज्ञानमूर्ती शर्मा, स्थानिक नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक योगेश वर्मा, नगरसेविका योगिता कोळी, माजी नगरसेविका जया तिवाना, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी नव्या शाळेच्या इमारतीची वैशिष्ट्ये, आधुनिक सुविधा आणि भविष्यातील शैक्षणिक विकासाच्या योजनांची माहिती दिली.

सन २०१९ मध्ये जुनी शाळा इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. नव्या इमारतीसाठी स्थानिक नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय स्तरावर आवश्यक मंजुरी, निधी आणि कामाच्या गतीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळत आज विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या.

G+6 मजली ही भव्य शाळा सुमारे १,५३० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची असून त्यामध्ये ५१ वर्गखोल्या, २ बालवाडी कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्हर्च्युअल लर्निंग रूम, सेमिनार हॉल, अॅक्टिव्हिटी हॉल, बहुउद्देशीय सभागृह, चित्रकला कक्ष, मध्याह्न भोजन कक्ष, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा आणि आधुनिक लिफ्ट व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

सोमवारी बाजार, काचपाडा, श्री मुथूमायवम्मन नगर, न्यू लिंक रोड तसेच परिसरातील दाट लोकवस्तीतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या शाळेचा थेट लाभ होणार असून महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पियूष गोयल म्हणाले, "मुंबई पब्लिक स्कूल ही केवळ शाळा नसून सामाजिक परिवर्तनाचे केंद्र आहे. महानगरपालिका विद्यार्थ्यांनाही खाजगी शाळांप्रमाणे आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, या उद्देशातून हा प्रकल्प साकार झाला आहे. प्रत्येक मुलाला उत्कृष्ट शिक्षणाची समान संधी मिळणे हीच खरी राष्ट्रनिर्मिती आहे."

नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आपल्या मनोगतात सांगितले, "शिक्षणावरील गुंतवणूक हा खर्च नसून भविष्यातील पिढी घडविण्याचा सर्वात मोठा सामाजिक उपक्रम आहे. सीबीएसई अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि कौशल्याधारित शिक्षणामुळे येथील विद्यार्थी राष्ट्रीय व जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम होतील. ही नवी शाळा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी दिवाळीपूर्वीची अनमोल भेट आहे."

महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही इमारत अल्पावधीत पूर्ण होऊन आज लोकार्पण होत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील स्किल इंडिया सेंटर, रुग्णालये, भूजल तलाव, उद्यान विकास यांसारख्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी प्रशासनातील त्रुटींविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांच्या प्रयत्नांमुळे शाळेची इमारत नियोजित वेळेत पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शाळेच्या अधिकृत उद्घाटनानंतर CBSE अभ्यासक्रमाअंतर्गत नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच प्रारंभ होणार असून परिसरातील पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रातील हा प्रकल्प केवळ एका नव्या इमारतीचे उद्घाटन नसून "प्रत्येक मुलाला उत्कृष्ट शिक्षणाचा अधिकार" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा उपक्रम असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. या लोकार्पणामुळे मालाड परिसरातील शिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.