भूकंपाच्या धक्क्यांनंतर प्रशासन सतर्क

भूकंपाच्या धक्क्यांनंतर प्रशासन सतर्क

हिंगोली, दि. ३ : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले. त्यापूर्वी औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी ७.४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी होती.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक ठिकाणी पाहणी आणि पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.