महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन

पदभरती प्रक्रिया अद्यापही सुरू केली नाही. त्यामुळे रुग्णसेवा कोलमडून पडेल, रुग्णांची हेळसांड होईल, त्यामुळे मुदतवाढ देणे गरजेचे आहे - आमदार मिहिर कोटेचा

मुंबई : महापालिकेच्या अधिपत्याखालील चार वैद्यकीय महाविद्यालये व एक दंत महाविद्यालय यामधील अधिष्ठाता, सर्जन आणि वरिष्ठ वैद्यकीय प्राध्यापक यांच्यासह सुमारे ५० हून अधिक पदे सप्टेंबर अखेरीस रिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा कोलमडू नये म्हणून या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुलुंड विधानसभेचे आमदार मिहिर कोटेचा आणि महापालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

आमदार मिहिर कोटेचा आणि भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन सदर मुद्यावर चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मागणीच्या अनुषंगाने उचित कारवाई कारणाचे आश्वासन दिल्याचे आमदार कोटेचा आणि शिंदे यांनी सांगितले. 

सप्टेंबरअखेर जे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना मुदतवाढ न दिल्यास रुग्णालयातील शस्त्रक्रिया सेवा ठप्प होण्याची, वैद्यकीय शिक्षणावर परिणाम होण्याची तसेच रुग्णालय प्रशासन कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, असे आमदार मिहिर कोटेचा आणि शिंदे यांनी सांगितले.

त्यांनी पुढे असे सांगितले की, नवीन भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे निर्माण होणारी पोकळी भरून निघेपर्यंत सध्याच्या पदाधिकाऱ्यांची सेवा सुरू ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आमदार मिहिर कोटेचा आणि प्रभाकर शिंदे यांनी नमूद केले.