मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी हुतात्मा चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पक्षाच्या दाव्यानुसार, ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला.

मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, सागर गवई, चेतन अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की झाल्याचाही आरोप करण्यात आला.

महिला आघाडीच्या मुंबई सदस्य ज्योती सोनवणे यांना ताब्यात घेताना पुरुष पोलिसांनी अयोग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांच्या कपड्यांची ओढाताण केली आणि गैरवर्तन केले, असा गंभीर आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिटलरशाही सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, हुकूमशाही मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद आणि हिटलरशाही बंद करो, अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारवर टीका करत जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा देण्याचे तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरी पोलीस ठाण्यात मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांच्यासह सुमारे २५ जणांना नेण्यात आले. जे. जे. पोलीस ठाण्यातही सुमारे २५ कार्यकर्त्यांना ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच फोर्ट येथील येलो गेट पोलीस ठाण्यात स्नेहल सोहनी, सागर गवई, अश्वजीत जगताप, पल्लवी शिंदे, शिल्पा रणदिवे, सतीश राजगुरू, स्वप्नील गायकवाड आणि दोडके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

हुतात्मा चौकातील या आंदोलनामुळे मुंबईत राजकीय वातावरण तापले असून, महिला कार्यकर्त्यांसोबत कथित गैरवर्तनाच्या आरोपांमुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.