रक्तदानातून जीवनदानाचा पुणे जिल्ह्यात संकल्प

रक्तदानातून जीवनदानाचा पुणे जिल्ह्यात संकल्प

पुणे, दि. ६ : राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत स्थानिक गरजेनुसार विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन करून सेवा संकल्पातून जीवनदान देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, प्रसूतीतील माता, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेकदा तातडीने रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन आरोग्य विभागाने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. रक्तदान हे सामाजिक कर्तव्याबरोबरच एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देणारी मानवतेची सेवा आहे. पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

या रक्तदान शिबिरात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानापूर्वी प्रत्येक रक्तदात्याची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून वैद्यकीय निकषांनुसार रक्तसंकलन केले जाणार आहे.

रक्तदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून पात्र व्यक्तींनी नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे. एका रक्तदात्याच्या रक्ताचा उपयोग गरजू रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे रक्तदान हा केवळ सामाजिक उपक्रम नसून संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणारी मानवतेची सेवा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्थानिक गरज ओळखून समाजासाठी उपयुक्त सेवा उपक्रम राबविणे हा सेवा संकल्प अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. रक्ताची गरज कोणत्याही वेळी कोणालाही भासू शकते. त्यामुळे पात्र नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून द्यावे आणि सेवा संकल्प अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.