लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे व्हिडिओ दालन सुरू करण्याची सूचना

लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे व्हिडिओ दालन सुरू करण्याची सूचना
लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे व्हिडिओ दालन सुरू करण्याची सूचना
लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या भाषणांचे व्हिडिओ दालन सुरू करण्याची सूचना

लंडन, दि. १८ सप्टेंबर : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडन येथील भारताचे उच्चायुक्त पेरियासामी कुमारन यांची इंडिया हाऊस येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

लंडनमधील हेन्री रोड येथे सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात त्यांच्या ऐतिहासिक भाषणांचे व्हिडिओ दालन सुरू करण्याची सूचना आठवले यांनी केली. संविधानसभेतील भाषणे, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केलेली भाषणे तसेच डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

या उपक्रमासाठी आधुनिक थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दिल्लीला परतल्यानंतर प्रयत्न करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. यावेळी भारत आणि युनायटेड किंगडमशी संबंधित विविध विषयांवर उच्चायुक्तांशी चर्चा करण्यात आली.

लंडनमध्ये भारतातील सुमारे २० लाख नागरिक वास्तव्यास असून दरवर्षी भारतातून सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षणासाठी लंडनमध्ये येतात, अशी माहिती उच्चायुक्त पेरियासामी कुमारन यांनी आठवले यांना दिली.

बैठकीदरम्यान अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत उपलब्ध असलेल्या परदेशी शिष्यवृत्ती योजनांची माहितीही उच्चायुक्तांना देण्यात आली. युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली.