लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा मार्गदर्शक बनावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा मार्गदर्शक बनावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा मार्गदर्शक बनावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकाधिकार सेना महासंघाने तरुणांचा मार्गदर्शक बनावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, ता. ९ : स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाने केवळ भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी लढणारी संघटना न राहता तरुणांना योग्य दिशा देणारा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक बनावे. रोजगार, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार आणि आधुनिक तंत्रज्ञानातील संधींबाबत तरुणांना मार्गदर्शन करून त्यांच्या विश्वासाचे केंद्र बनावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री भरत गोगावले, शिवसेना सचिव संजय मोरे, संजय म्हशिलकर, चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक लोकाधिकार समितीच्या अध्यक्ष गोमती पाचभाई, राजा रामदवार यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

शिवसेनेच्या स्थापनेमागे मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावे आणि आपल्या हक्कांसाठी लढता यावे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. बँका, विमा कंपन्या आणि एलआयसीसह विविध क्षेत्रांत स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीने महत्त्वपूर्ण काम केले. मात्र, बदलत्या काळानुसार रोजगाराचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कोडिंग, डेटा सायन्स, डिजिटल सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप यांसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना संधी मिळवून देण्यावर भर द्यावा, असे शिंदे यांनी सांगितले.

नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे हात तयार झाले पाहिजेत, हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. त्यानुसार तरुणांनी स्वयंरोजगार आणि उद्योग क्षेत्राकडे वळावे. गडचिरोलीतील सूरजागड प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार लोकांना रोजगार मिळाला असून, टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने दरवर्षी सुमारे पाच हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मिशन खाकीअंतर्गत मैदाने, अभ्यासिका, प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. याच धर्तीवर विविध सरकारी भरती प्रक्रियांमध्ये तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी लोकाधिकार महासंघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्थानिकांना रोजगार मिळवून देताना शिवसेनेची कार्यपद्धती म्हणजे मारामारी नव्हे, तर संवाद, निवेदन आणि संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे होय, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना कायदेशीर आणि संघटित मार्गाने प्रश्न सोडविण्यावर भर देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत बोलताना लाडकी बहीण योजनेसोबतच महिलांना लखपती बहीण बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गट आणि महिला उद्योगांना प्रोत्साहन देण्याबरोबरच दुष्काळाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे उद्योगवाढीला चालना मिळत असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका मांडल्याचा उल्लेख करून त्यांनी जगभरात पोहोचलेल्या मराठी माणसाचा अभिमान व्यक्त केला. शिवसेना आणि भाजप युती ही विचारांची आणि विकासाची युती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पदाधिकाऱ्यांना कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला देत शिंदे यांनी महासंघाच्या भविष्यातील वाटचालीबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. तरुणांच्या रोजगारापासून कौशल्य विकासापर्यंत प्रत्येक प्रश्नात महासंघाने सक्रिय भूमिका बजावावी. तरुणांचा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक बनून महासंघाने त्यांच्या विश्वासाचे स्थान मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.