व्यसनमुक्त भारतासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
व्यसनमुक्त भारतासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
व्यसनमुक्त भारतासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

नाशिक, दि. २८ : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच मित्र, कुटुंबीय आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा. युवकांच्या सामर्थ्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करून विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक आणि एस. जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. राज्यपालांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.

युवाशक्ती राष्ट्राची संपत्ती

भारताची सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून ही युवा शक्ती देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात निश्चित ध्येय ठेवून शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक विचारांच्या बळावर यश मिळवावे, असे राज्यपाल म्हणाले.

शिक्षणासोबत चारित्र्यनिर्मिती आवश्यक

शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविणे नसून व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य घडविण्याची प्रक्रिया आहे. अमली पदार्थांच्या व्यसनांमुळे युवकांच्या एकाग्रतेवर आणि भविष्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून समाजात जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवा

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना चुकीची संगत आणि व्यसनांच्या प्रलोभनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. पालक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठे कष्ट घेतात. त्यांच्या त्यागाचा सन्मान राखून विद्यार्थ्यांनी व्यसनांना ठामपणे नकार द्यावा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे ते म्हणाले.

मान्यवरांचा गौरव

कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलीप गावित, सर्वेश कुशारे, ॲड. जयंत जायभावे, माजी आमदार निशिगंधा मोगल, डॉ. हिरालाल पवार, मिलिंद जोशी आणि शिवम यादव यांचा सत्कार करण्यात आला.

ॲड. महेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. स्वाती पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी आमदार जयंत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.