उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सुधारीत भारतीय दंड संहिता कायदा मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन

उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सुधारीत भारतीय दंड संहिता कायदा मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 पिंपळे सौदागर :-पिंपळे सौदागर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सांगवी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने सुधारीत भारतीय दंड संहिता कायदा मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी नागरिकांना सुधारित कायदे आणि सायबर सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले, “आयपीसी, सीआरपीसी व भारतीय पुरावा कायदा या तीन कायद्यांच्या बदली आता भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन कायदे १ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत. पूर्ण देशभरात हे कायदे लागू करण्यात आले आहेत. याबाबत अद्याप सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी माहिती नाही. तसेच, सर्व वयोगटातील नागरिकांना सध्या सायबर फ्रॉडची भीती भेडसावत आहे. त्यामुळे, आजच्या मार्गदर्शन सत्रात या महत्त्वाच्या विषयाचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. या मार्गदर्शन सत्राचा फायदा निश्चितपणे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध वयोगटातील नागरिकांना होईल असा मला विश्वास वाटतो.” 
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे, पोलीस हवालदार तुषार साळुंखे, पोलीस हवालदार प्रकाश शिंदे, तात्या शिंगारे, विठाई वाचनालयचे सभासद, आनंद हास्य क्लब चे सभासद, ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर परिसरातील जागरूक नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.