संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य रॅली
पुणे, दि. २६ : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संविधान दिनानिमित्त पुणे शहरात भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीच्या प्रारंभी बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. उपमहापौर परशुराम वाडेकर आणि समाज कल्याण आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीमध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून तसेच बॅनर, पोस्टर्स आणि जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा संदेश दिला.
भिडे वाडा, लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक आणि जुनी जिल्हा परिषद मार्गे ही रॅली पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पोहोचली. तेथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. संविधानातील मूलभूत मूल्यांची जाणीव समाजात रुजविण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.