अलिम्को शिबिराला दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिम्को शिबिराला दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिम्को शिबिराला दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिम्को शिबिराला दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ADIP SSA समग्र शिक्षा योजनेंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को संस्थेच्या तज्ज्ञ पथकाद्वारे मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुक्मिणी नगर येथील मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १९ येथे सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी हे शिबिर पार पडले.

शिबिरात अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शून्य ते १८ वयोगटातील अस्थिव्यंग, सीपी, बहुविकलांग, कर्णबधिर आणि अल्पदृष्टी प्रवर्गातील १४७ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी व मोजमाप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली २३८ साहित्ये, साधने आणि सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक होत्या. उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी पालकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पात्र विद्यार्थ्यांना जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी महानगरपालिका प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कुलट यांनी केले, तर उज्ज्वल जाधव यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिका अधिकारी, विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक आणि शिक्षिकांनी परिश्रम घेतले.