आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
KS News सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे
सोलापूर दिनांक 12 मे 2026 : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने १२ मे २०२६ रोजी उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला माननीय खासदार, प्राध्यापिका डॉ. ज्योतीताई वाघमारे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत, “मी सोलापूरची कन्या आहे. परिचारिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून त्यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर मांडण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन परिचारिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करेन,” असे आश्वासन दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्षा डॉ. मनीषा जनार्दन शिंदे यांनी परिचारिकांच्या विविध जिव्हाळ्याच्या मागण्या मांडल्या. सध्या शासनाकडून प्रशासकीय बदल्यांचे हत्यार वापरले जात असल्याबाबत चिंता व्यक्त करत परिचारिकांचे सेवा, बदली, पदोन्नती व इतर प्रशासकीय प्रश्न थेट विधानभवनात मांडून ते निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी माननीय खासदार महोदया यांच्याकडे केली.
या सोहळ्यात आरोग्यसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या परिचारिकांचा गौरव करण्यात आला.
गौरव प्राप्त परिचारिकांची नावे पुढीलप्रमाणे :
१) श्रीमती कविता कृष्णा ढगे – अधिसेविका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर
२) डॉ. मनीषा जनार्दन शिंदे – प्राचार्या, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय
३) श्रीमती संगीता परमेश्वर लोखंडे – परिसेविका, अतिदक्षता विभागात १० वर्षे व प्रसूती विभागात १० वर्षे सेवा
४) श्रीमती अंबिका जगन्नाथ म्हेत्रे – अधिपरिचारिका, बालरोग विभागात ५ वर्षे व नवजात अतिदक्षता विभागात १५ वर्षे सेवा
५) श्रीमती ज्योती सुनील चावरिया – अधिपरिचारिका, वैद्यकीय अतिदक्षता विभागात १५ वर्षे सेवा
इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूरचे अध्यक्ष डॉ. संजय मंथळे यांनी प्रास्ताविकात परिचारिकांचे आरोग्यसेवेत असलेले योगदान अमूल्य असल्याचे सांगितले.
हा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी परिचारिकांच्या सेवाभावाला सलाम करत त्यांचे अभिनंदन केले.