१.९० कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात एकाला न्यायालयीन कोठडी, साहिल पीरजादेला वाढीव पोलीस कोठडी
सोलापूर : मोदी कब्रस्थान परिसरात १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिजवान शब्बीर खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून साहिल सिकंदर पीरजादे यास आणखी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश श्री. सुरवसे यांनी दिले.
या कारवाईत पोलिसांनी ९५० ग्रॅम एमडी ड्रग्जसह १० लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त केली असून एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेसह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
शहर गुन्हे शाखेच्या पथकाला १२ मे रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज मार्गावर उभ्या असलेल्या हुंडाई क्रेटा कारवर छापा टाकण्यात आला. वाहनाची झडती घेतली असता ड्रॉवरमध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवलेला पांढऱ्या स्फटिक स्वरूपातील मेफेड्रोन अमली पदार्थ आढळून आला.
चौकशीत आरोपी रिजवान खान याने हा साठा साहिल सिकंदर पीरजादे आणि अफजल मुर्शीद यांच्याकडून मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली