उड्डाणपुलावरून पडलेल्या १६ वर्षीय युवकाची सुखरूप सुटका

उड्डाणपुलावरून पडलेल्या १६ वर्षीय युवकाची सुखरूप सुटका
उड्डाणपुलावरून पडलेल्या १६ वर्षीय युवकाची सुखरूप सुटका
उड्डाणपुलावरून पडलेल्या १६ वर्षीय युवकाची सुखरूप सुटका

पनवेल : कर्नाळा स्पोर्ट्सजवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावरून खाली पडलेल्या १६ वर्षीय युवकाची पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने धाडसी बचावकार्य करत सुखरूप सुटका केली. १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

उड्डाणपुलावरून युवक खाली पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळाची परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ आणि साहित्य मागविण्यात आले. दोन जवानांनी सुमारे दीड किलोमीटर पायी प्रवास करून युवकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गाठला. त्यानंतर दोरखंड, बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि टॉर्चच्या मदतीने नियोजनबद्ध बचावकार्य राबवून युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

शिवांश दामले असे बचाव करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो ओल्ड पनवेलमधील लाईन आळी परिसरातील रहिवासी आहे. सुटकेनंतर त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बचावकार्यात उपअग्निशमन केंद्र अधिकारी शुभम राठोड यांच्यासह अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परता, धाडस आणि समन्वयामुळे युवकाची सुखरूप सुटका शक्य झाली.

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी आणि जवानांचे कौतुक करून अभिनंदन केले.

दरम्यान, कर्नाळा स्पोर्ट्सजवळील नवीन उड्डाणपुलावर काही ठिकाणी काम सुरू असल्याने नागरिकांनी या परिसरात गर्दी करू नये तसेच तेथे फटाके फोडू नयेत, असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे यांनी केले आहे.