कांदिवलीत भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी

कांदिवलीत भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी

मुंबई (मुंबई प्रतिनिधी: सौ रूपाली बैसाने): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात १५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने कांदिवली (पश्चिम) येथे २० नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदिवासी समाज बांधवांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांचा इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसमोर आणून त्यांच्या कार्याची ओळख देशाला करून दिली. तसेच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर आदिवासी समाजातील महिला द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजाचा सन्मान झाला आहे, असे प्रतिपादन आमदार भोये यांनी केले.

आमदार योगेश सागर यांनी आदिवासी, ओबीसी तसेच भटक्या-विमुक्त समाजासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर आणि सीए होण्याची इच्छा असल्यास त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, भाजपाचे उत्तर मुंबई अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक (बाळा) तावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अप्पा बेलवलकर, गिरीधर साळुंके, ॲड. सुनील कदम, सुरेंद्र गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील नागरिकांना १९ जातींचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, आयुष्मान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बाविस्कर यांनी केले, तर पार्वती धोडी यांनी आभार प्रदर्शन केले.

– गिरीधर साळुंके

जिल्हा संयोजक