गांधीवाद म्हणजे आध्यात्मिक मानवतावाद : डॉ. सतीश तराळ

गांधीवाद म्हणजे आध्यात्मिक मानवतावाद : डॉ. सतीश तराळ
गांधीवाद म्हणजे आध्यात्मिक मानवतावाद : डॉ. सतीश तराळ

अमरावती, दि. ४ : महात्मा गांधी हे विश्वातील थोर व्यक्तिमत्त्व असून, गांधीवाद ही वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आहे. गांधीजींचा आचार हाच गांधीवाद असून, तो धार्मिक, आध्यात्मिक मानवतावादावर आधारित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ यांनी केले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर यांच्या वतीने गांधी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. तराळ बोलत होते.

गांधीवादाचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून जगभरातील नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ आणि कलावंतांवर त्याचा प्रभाव पडला. सत्य, अहिंसा, सर्वोदय आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींनी जगाला नवी दिशा दिली. आत्मपरीक्षण आणि आत्मज्ञानातून त्यांनी उच्च नैतिक मूल्यांचा शोध घेतला, असे डॉ. तराळ यांनी सांगितले.

यावेळी महात्मा फुले, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. सामाजिक समता, शिक्षण, साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला. व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धेविरोधात विवेकवादी व मानवतावादी समाजनिर्मितीचे आवाहन करण्यात आले.

डॉ. दिलीप काळे, पुरुषोत्तमराव गावंडे, प्राचार्य दिलीपसिंह खांबारे, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. मंदा नांदुरकर, ॲड. नीता कचवे यांच्यासह विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

गांधीजींच्या विचारांवर आधारित भजनांचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. राणी नागापुरे यांना पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक डॉ. मंदा नांदुरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले, तर आभार प्रतिभा खापरे यांनी मानले. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.