ज्येष्ठ समाजसेवक युनूसचाचा शेख यांना समाजभूषण पुरस्कार
पुणे : शंभरावे पुणे मराठी काव्य संमेलन २०२६ अंतर्गत रानकवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच, पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक युनूसचाचा शेख यांना डॉ. बाबा आढाव समाजभूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
मुंढवा येथील युनूसचाचा शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. हडपसर येथील साने गुरुजी आरोग्य केंद्रात ते गेल्या ३० वर्षांपासून सेवाकार्य करत आहेत. स्वर्गीय डॉ. दादासाहेब गुजर आणि स्वर्गीय प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या प्रेरणेतून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी समाजसेवेला प्राधान्य दिले. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, वृद्धाश्रमातील नागरिक व अनाथांना अन्नदान, मोफत नेत्रतपासणी शिबिरे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला.
२१ ऑगस्ट २०१५ रोजी मानस सोशल फाउंडेशनची स्थापना करून त्यांनी सामाजिक कार्याला व्यापक स्वरूप दिले. तसेच कर्मयोगी अन्नछत्राच्या माध्यमातून केवळ ३० रुपयांत गरजू नागरिकांना पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा अनेक गोरगरीब नागरिकांना लाभ झाला आहे.
युनूसचाचा शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेने त्यांना पाच वेळा पुरस्कार देऊन गौरविले आहे. गुरुकुल विश्वपीठ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार तसेच के. जी. एन. खिदमत फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा नामदार शरदचंद्र पवार यांच्या हस्तेही गौरव करण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर युनूसचाचा शेख यांनी हा सन्मान आपले प्रेरणास्थान स्वर्गीय डॉ. दादा गुजर यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.
पुरस्कार सोहळ्यास रविंद्रजी बर्डे, हाजी महेबूबभाई शेख, बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन वाघमारे, कायदेतज्ज्ञ ॲड. अनंत पाटील, श्रद्धाताई अनंत पाटील, अब्दुलरहेमान सय्यद, कवी चंद्रकांत जोगदंड, कवी दशरथ दुनघव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.