ठाणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

ठाणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात
ठाणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

ठाणे, दि. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान २०२६ राबविण्यात येत आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

शासनाच्या विविध योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. तसेच वृक्षारोपण, लाभार्थींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेणे, बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणे, वृद्धाश्रमांना भेटी देणे आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सामाजिक उपक्रमांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.

समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक दीपा मुधोळ मुंडे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे आणि विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी दिली.