दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
मेहकर, दि. २७ : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना दिलासा देण्यासाठी गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्या बँका, सावकार आणि मायक्रोफायनान्स संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा, सेवा संकल्प अभियान तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
शेतकरी कुटुंबाच्या अडचणी जाणून घेतल्या
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दामोदर इंगळे आणि कमलाबाई इंगळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्यासोबत भोजन केले. यावेळी त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक अडचणी, मुलांचे शिक्षण आणि भविष्याविषयीची चिंता जाणून घेतली. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ देणार नाही, शिवसेना या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मुलींचे विवाह आर्थिक अडचणींमुळे रखडू नयेत, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
दुष्काळग्रस्तांसाठी विविध उपाययोजना
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये, पाच हजार रुपयांची आगाऊ मदत, कर्जवसुलीला स्थगिती, जमीन महसुलात सवलत, कृषी पंपांच्या वीजबिलाबाबत दिलासा, परीक्षा शुल्क माफी आणि मनरेगाच्या निकषांमध्ये शिथिलता अशा उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या, पाणीपुरवठा आणि गरजू शेतकऱ्यांना घरपोच चारा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलतारा उपक्रम, क्लस्टर शेती आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देऊन शेतीला सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आणि आरोग्य योजनांवर भर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा विश्वास शिंदे यांनी दिला. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क परतावा देण्याच्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला.
शिवसेनेच्या माध्यमातून ११ हजार बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया, दोन हजारांहून अधिक कॉक्लियर इम्प्लांट आणि आरोग्य उपक्रमांतर्गत तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मेहकरच्या विकासासाठी मोठा निधी
मेहकर शहरासाठी ९२५ कोटी रुपये, तर संपूर्ण मतदारसंघासाठी सुमारे पाच हजार ५०० कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी केवळ घरात न बसता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचावे आणि मदत केंद्रांच्या माध्यमातून संकटग्रस्तांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रतापराव जाधव यांचे मानधन सहायता निधीसाठी
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सहा महिन्यांचे सात लाख ५१ हजार रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. याबाबतचा धनादेश त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
लाभार्थ्यांना साहित्य आणि अनुदानाचे वाटप
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान व धनादेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाड, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.