दृष्टीबाधित प्रशिक्षण केंद्रात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

दृष्टीबाधित प्रशिक्षण केंद्रात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे 

सोलापूर (प्रतिनिधी) : एन.ए.बी. संचलित मा. सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कर्णिक नगर, सोलापूर येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब संस्थेचे उपाध्यक्ष मा. अंकुश कदम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेक्रेटरी मा. शशिभूषण यलगुलवार यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यशाळेचे अधीक्षक श्री. रामचंद्र कुलकर्णी यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यानंतर श्री. रियाज मुल्ला यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा सविस्तर सांस्कृतिक अहवाल सादर करत विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांतील सहभाग व यश अधोरेखित केले. पालक प्रतिनिधी म्हणून श्री. अलकुंटे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व शिक्षकांचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे मा. शशिभूषण यलगुलवार यांनी मार्गदर्शनपर भाषणात कार्यशाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात मा. अंकुश कदम यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या मेळाव्यात पालक व शिक्षक यांच्यात प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी भविष्यातील दिशा निश्चित करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. रियाज मुल्ला यांनी केले. हा मेळावा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा ठरला. कार्यक्रमासाठी शुभम वांझरे व श्रीनिवास समदूर्ले यांचे सहकार्य लाभले.