नवोन्मेषातून महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

नवोन्मेषातून महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
नवोन्मेषातून महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

मुंबई, दि. १६ : नवोन्मेष आणि स्टार्टअप परिसंस्थेच्या बळावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सिंगापूर येथे आयोजित टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६ मध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या नवोन्मेषाधारित विकासाचा दृष्टिकोन जागतिक समुदायासमोर मांडला.

महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील अग्रगण्य इनोव्हेशन हब बनविण्यासाठी स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि युवा नवोन्मेषक यांना सक्षम परिसंस्थेत जोडण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या परिषदेला आशियातील दोन हजारांहून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी, जागतिक नेते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या स्टार्टअप परिसंस्थेचे सादरीकरण

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी परिषदेत उद्घाटनपर मुख्य भाषण केले. महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्था, युवा नवउद्योजकांसाठीच्या योजना, इनक्युबेशन सुविधा आणि डीप टेक क्षेत्रातील संधी यांची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणावरही त्यांनी प्रकाश टाकला. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डीपफेक प्रतिबंधक तंत्रज्ञान, फिनटेक, क्लीनटेक आणि रोबोटिक्स यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांत राज्याचे स्थान बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यात स्टार्टअप्स, नवोन्मेष, प्रगत तंत्रज्ञान, इनक्युबेशन, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणी या क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची स्टार्टअप कॅपिटल म्हणून ओळख अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.