पंचायत राजाचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव

पंचायत राजाचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव
पंचायत राजाचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव

बीड : शालेय अभ्यासक्रमातील पंचायत राज संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावी, या उद्देशाने बीड शहरातील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने बीड तालुक्यातील आदर्श वंजारवाडी येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीतील १४३ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत ग्रामपंचायतीचे कामकाज आणि गावातील विकासकामांची माहिती घेतली.

वंजारवाडीचे सरपंच वैजनाथ तांदळे यांनी विद्यार्थ्यांसाठी तब्बल तीन तास वेळ देत ग्रामपंचायतीचे नियोजन, निधीचे वाटप, स्वच्छता, वृक्षसंगोपन आणि गावाच्या विकासाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून ग्रामविकास प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

देशाचा विकास करण्यासाठी प्रथम गावाचा विकास आवश्यक असून, त्याची सुरुवात स्वतःच्या विकासापासून होते. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वयंशिस्त, स्वच्छता आणि उत्तम शिक्षणाचा अंगीकार करावा, असे आवाहन सरपंच वैजनाथ तांदळे यांनी केले.

वंजारवाडीतील विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरले. गावातील पाच प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा जांभूळ, आंबा, नारळ आणि फणसाची झाडे लावण्यात आली असून सात हजार झाडांना ठिबक सिंचन आणि क्रमांक देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत पिठाची गिरणी आणि किराणा दुकानही चालविले जाते. ग्रामस्थांना सहा महिन्यांपर्यंत उधारीवर किराणा उपलब्ध करून दिला जातो.

गावात पाच रुपयांत २० लिटर शुद्ध आणि फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करून दिले जाते. पाण्याची टंचाई असलेल्या या गावात १९ बंधारे बांधण्यात आले असून २५० एकर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. तसेच प्रत्येक रस्त्यावर हात धुण्याची सुविधा, ओला आणि सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्या, सांडपाणी व्यवस्थापन आणि मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. ग्रामपंचायत प्रत्यक्ष कशी कार्य करते, गावाचा विकास कसा साधला जातो आणि लोकसहभागाचे महत्त्व काय आहे, हे विद्यार्थ्यांना या भेटीतून समजले, असे माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले.

या शैक्षणिक दौऱ्यात संचालक ज्ञानेश्वर तांबे, मुख्याध्यापिका सारिका जगताप यांच्यासह अमोल क्षीरसागर, ज्ञानेश्वर जरांगे, अशोक चौरे, रहमान शेख, अर्चना जोगदंड, अश्विनी काकडे, अमिना भाभी तसेच शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.