पनवेलमध्ये स्वच्छता अभियानाला वेग २ ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन
पनवेल, दि. २४ : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता में सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत या संकल्पनेवर आधारित स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानाला वेग आला आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १ ते २० मध्ये विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या माहितीनुसार, अभियानात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जनभागीदारी अभियान, स्वच्छ पाठशाळा, सफाई मित्र सुरक्षा, सेवा व सन्मान शिबिर, श्रमदान तसेच स्वच्छ भारत दिवस अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
अभियानांतर्गत प्रभाग अ, ब, क आणि ड मधील कचरा साचणाऱ्या व दुर्लक्षित ठिकाणांची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिमाही राबविण्यात आली.
रोडपाली येथील श्री म्हसोबा तलाव, नवीन पनवेलमधील कृत्रिम तलाव, बेलपाडा विसर्जन घाट, रोहिंजण गणेश घाट, वडाळे आणि बल्लाळेश्वर तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कामोठे सेक्टर ८ मध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दुकानदारांना प्लास्टिक बंदीबाबतही जनजागृती करण्यात आली.
कामोठे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी येथे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, कचरा वर्गीकरण आणि घरगुती कंपोस्टिंगबाबत माहिती देण्यात आली.
रोडपाली सेक्टर १५ येथे नालेसफाई करण्यात आली. पिसार्वे गावातील धार्मिक स्थळे आणि कचरा साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. खारघर परिसरात प्लास्टिकमुक्ती आणि स्वच्छता रॅलीही काढण्यात आली.
विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, सर्व प्रभागांचे स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचारी या अभियानात सक्रिय सहभागी झाले आहेत. आगामी काळातही विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.