पनवेल मनपाचा दशकपूर्ती महोत्सव सुरू

पनवेल मनपाचा दशकपूर्ती महोत्सव सुरू
पनवेल मनपाचा दशकपूर्ती महोत्सव सुरू
पनवेल मनपाचा दशकपूर्ती महोत्सव सुरू

पनवेल, दि. १ : पनवेल महानगरपालिकेने अधिकाधिक लोकाभिमुख कारभार करून नागरिकांना दर्जेदार सुविधा आणि समाधान मिळवून द्यावे, असे प्रतिपादन महापौर नितीन पाटील यांनी केले.

पनवेल महानगरपालिकेच्या वर्धापनदिन तसेच दशकपूर्ती महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महापौर नितीन पाटील यांनी वर्धापनदिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून त्यांनी आभार व्यक्त केले.

महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ही आपलीच पालिका आहे, अशी भावना निर्माण व्हावी आणि त्यांची कामे सुलभपणे व्हावीत, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे महापौरांनी सांगितले. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात सुसंवाद राहिल्यास कामांना गती मिळून त्याचा थेट लाभ नागरिकांना होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिकेच्या विविध विभागांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या तसेच सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून भविष्यात आर्थिक क्षमता आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेसमोरील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पदाधिकारी आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम केल्यास विकासाला अधिक गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त गणेश देशमुख यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या विकासकामांना सुरुवात झाल्याचे सांगितले. सर्व घटकांना न्याय मिळावा आणि गरजू नागरिकांना तातडीने मदत मिळावी, या दृष्टीने महापालिकेने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळालेल्या सुंदराबाई जाधव, केतन जाधव, गोविंद गायकवाड आणि रघुनाथ जाधव या चार लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना परिवहन उपायुक्त कैलास गावडे यांनी केली. आभार उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी मानले, तर सूत्रसंचालन मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले.

वर्धापनदिनानिमित्त महापालिका मुख्यालय तसेच चारही प्रभाग समिती कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.