बीडमध्ये २५ शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा

बीडमध्ये २५ शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा
बीडमध्ये २५ शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा
बीडमध्ये २५ शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा

बीड, दि. ४ : दुष्काळ आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पुणे येथील श्री शिव गोरक्ष आश्रम ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील वारसांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या उपस्थितीत धनादेशांचे वितरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे ही मदत उपलब्ध झाली. ट्रस्टचे अध्यक्ष किशोर मंडलिक, राजेंद्र अडगळे आणि राजेंद्र दीक्षित यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

केज, माजलगाव, आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, धारूर, गेवराई, बीड, शिरूर कासार आणि वडवणी या तालुक्यांतील २५ कुटुंबांची मदतीसाठी निवड करण्यात आली होती.

आर्थिक मदतीसोबतच या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी लाभार्थी महिलांशी संवाद साधून त्यांच्या कौशल्यांची आणि गरजांची माहिती घेतली. शिवणकामाचे कौशल्य असलेल्या महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याबाबत, तर शेळीपालनाची इच्छा असलेल्या महिलांना प्रशिक्षण देऊन शासकीय योजनांच्या माध्यमातून शेळ्या उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले.

कुटुंबातील मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी त्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एका कुटुंबातील आजारी वृद्ध सदस्याला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी दिल्या.

लाभार्थी महिलांना संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनचे धान्य नियमित मिळते की नाही, याचीही अधिकाऱ्यांनी खात्री केली. योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत विवाह सोहळ्यांवर अवाजवी खर्च करून कुटुंबांनी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी प्रशासनाने सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या योजनेत सहभागी होणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. येत्या २४ आणि २५ तारखेला तसेच डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक कुटुंबांनी समाजकल्याण विभागाकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.