मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करू नका : रामदास आठवले
मुंबई, दि. २६ : मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी शिकली पाहिजे, मात्र केवळ मराठी येत नाही म्हणून त्यांच्या परवान्यांवर कारवाई करून ते रद्द करू नयेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
बांद्रा येथील संविधान निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेकडो रिक्षा चालकांनी त्यांची भेट घेतली. रिक्षा चालकांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आम्ही मराठी शिकणार नाही, अशी भूमिका रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परप्रांतीयांना मराठी भाषा येत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र सोडावा, या आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले होते. ही भूमिका चुकीची असून संविधानाच्या मूलभूत अधिकारांना छेद देणारी असल्याचे आठवले यांनी सांगितले. भारतीय संविधानाने देशातील कोणत्याही नागरिकाला देशातील कोणत्याही राज्यात जाऊन उपजीविका करण्याचा अधिकार दिला आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशभरातील नागरिक येथे रोजगार आणि व्यवसायासाठी येतात. मोठे उद्योगपती आणि व्यापारी ज्या प्रकारे मुंबईत स्थायिक झाले आहेत, त्याचप्रमाणे गरीब परप्रांतीय रिक्षा चालकही उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले आहेत. अशा गरीब रिक्षा चालकांना महाराष्ट्रातून चालते व्हा, असे सांगणे योग्य नाही, असे आठवले म्हणाले.
मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. मात्र त्यांना भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली पाहिजे. मराठी न आल्यामुळे थेट परवाने रद्द करून या गरीब चालकांच्या उदरनिर्वाहावर गदा आणू नये, अशी आमची भूमिका आहे, असे आठवले यांनी सांगितले.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करू नयेत, तसेच मराठी भाषा शिकण्यासाठी अधिक मुदत देण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिवहन विभागाने रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याबाबत घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध नाही. मराठी शिकणे आवश्यक आहे, मात्र परवाने रद्द करण्याची भूमिका शासनाने घेऊ नये, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
आपण १९९० मध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री असताना रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने खुले केले होते, अशी आठवणही रामदास आठवले यांनी यावेळी करून दिली.