मुंबई आझाद मैदानात परिचारिका पदभरतीसाठी धरणे आंदोलन; २२०० हून अधिक रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी: ( सौ रूपाली मनोज बैसाने.)
मुंबई, दि. २२ जून २०२६ : राज्यातील ग्रामविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रिक्त असलेली सुमारे २२०० हून अधिक परिचारिका पदे तात्काळ भरावीत, तसेच G.N.M./B.Sc नर्सिंग उमेदवारांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे पारदर्शक पद्धतीने नियुक्ती द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनामार्फत २०२३ मध्ये G.N.M./B.Sc नर्सिंग पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. राज्यभरातील हजारो उमेदवारांनी या प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. आवश्यक कागदपत्र पडताळणी, गुणवत्तायादी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही अनेक पात्र उमेदवारांना नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
या अन्यायामुळे अनेक युवक-युवती मानसिक तणावाखाली असून काही उमेदवारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे शासनाने प्रलंबित नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित करून पात्र उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी असेही नमूद केले की, ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रशिक्षित G.N.M. आणि B.Sc नर्सिंग उमेदवारांची मोठी गरज आहे. त्यामुळे रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याची आवश्यकता आहे.
सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनापूर्वी लोकशाही मार्गाने बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
निवेदक :
१) राजश्री काशीनाथ मनोहर
२) वैशाली एकनाथ वाव्हळ
३) महिमा ललित चौरे
४) आकांक्षा सुनील पाटील