मुंबई पुस्तक महोत्सव म्हणजे संवेदना आणि माणुसकीचा उत्सव : मुख्यमंत्री

मुंबई पुस्तक महोत्सव म्हणजे संवेदना आणि माणुसकीचा उत्सव : मुख्यमंत्री

मुंबई, दि. २४ : पुस्तके माणसाला संवेदनशील बनवतात आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही जीवनातील भावना, प्रेम आणि संवेदना यांचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सव हा संवेदना आणि माणुसकीचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मुंबईत दरवर्षी पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही केली.

या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, महापौर ऋतु तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ या महोत्सवाचे सहयोगी आहेत. महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तक स्टॉल्स उभारण्यात आले असून विविध भाषा आणि साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख पुस्तकप्रेमींनी भेट दिली. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बालकांसाठी विविध मनोरंजक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवादरम्यान साहित्यिक संवाद, लेखकांशी चर्चा, पुस्तक प्रकाशन, विविध विषयांवरील प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह १०० हून अधिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. देशातील साहित्यिक, कलाकार, खेळाडू, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, स्क्रीन टाइम कमी करून वाचनासाठी वेळ वाढविणे आणि समाजात वाचन संस्कृती रुजविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या पुस्तक महोत्सवामुळे मुंबईच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाला नवी दिशा मिळणार आहे.