मुख्यमंत्र्यांकडून " लिंगायत " पुन्हा बेदखल : मुंबईला बोलावून अपमान. डाॅ.बसवराज बगले यांचा आरोप
सोलापूर - महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या मागण्यांना बेदखल करण्याचा आणि समाजहिताच्या ठोस तोडगा न काढण्याचा कुचेष्टा करण्याचा भाजपाचा कुटील डाव पुन्हा एकदा सिध्द झाला आहे.असा टोला महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी लगावला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वाचा स्वाभिमान बाळगून, समाजाच्या भल्यासाठी राज्यातील लिंगायत समाज भाजपला साथ देत आहे.मात्र त्याची दखल न घेता सत्ताधारी भाजपकडून गेल्या अनेक वर्षात अवहेलनाच केली जात आहे.
९ च्या क्रांतीदिनी कोल्हापूर परिसरातील लिंगायत समाज विविध प्रश्नांसाठी एकवटला होता आणि लाखोंच्या संख्येने साखळी उपोषण सुरू केले होते.आंदोलनाचे हत्यार बोथट करण्यासाठी गडहिंग्लजचे आमदार शिवाजी पाटील यांना मध्यस्थी घालून मुंबईत बैठक घेऊन समाजाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन देण्यात आले.मात्र कोणत्याही लिंगायत प्रमुखांना अथवा लोकप्रतिनिधींना विश्वासात तर घेतलेच नाही.उलट बैठकीसाठी मुंबईला गेलेल्या कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला दारातच ताटकळत ठेवल.मंत्रिमंडळ बैठक संपवून जाता-जाता मुख्यमंत्र्यांनी निवेदनाचे तेच कागद पून्हा घेतले.समाजाच्या प्रश्नात लक्ष घालू असे आश्वासन पुन्हा दिले,एक मिनिटाचा सुध्दा वेळ न देता बैठक व चर्चा न करता पुन्हा एकदा लिंगायत शिष्टमंडळाचा बोलावून अपमान केल्याची संतप्त प्रतिक्रिया समाजात उमटली आहे. संस्कारक्षम आचरणाने सहनशीलतेचा अपमान सहन करण्याऐवजी लिंगायतांनी आता सावध होऊन आपला अवतार दाखविणे ही काळाची गरज बनली आहे.
● आर्थिक विकास महामंडळाचे गाजर.....!
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील मराठा,ब्राह्मण,रजपूत आणि आर्य वैश्य या चार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून त्यांच्यासाठी दरवर्षी ५ कोटींची तरतूद केली आहे.मात्र एकूण लोकसंख्येच्या ८ टक्के लिंगायत समाज असताना सत्ताधारी सरकार मात्र दखल न घेता खुल्या प्रवर्गातील लिंगायतांना आर्थिक सवलती पासून वंचित ठेऊन कुचेष्टा करत आहे.खुल्या प्रवर्गातील लिंगायत घटकांना आर्थिक सवलतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा देऊन एक हजार कोटींची तरतूद करावी आणि दरवर्षी १০ कोटी रुपये मिळावेत या मागणीला सरकारकडून गाजर दाखविले जात आहे,त्यामुळे समाजातील भावी पिढीचे भविष्य अंधकारमय बनत आहे.अशीही संतप्त प्रतिक्रिया डाॅ.बगले यांनी दिली.
● लिंगायत अस्तित्वाला धोका...!
जनगणनेत धर्म म्हणून हिंदू असा धर्माचा उल्लेख करण्याबाबत विषारी प्रचार संघाच्या काही टोळक्यांना हाताशी धरून केला जात आहे.हिंदूची फुगीर संख्या दाखवण्यासाठी गनिमी कावा आखलेल्या संघाकडून हिंदुत्वाचा डांगोरा पिटवणे आणि लिंगायतांचे स्वतंत्र अस्तित्व संपवणे हा गनिमी कावा मात्र पध्दतशीरपणे अवलंबला जात आहे.याला बळी न पडता प्रत्येकांनी धर्माच्या रकान्यात लिंगायत असाच उल्लेख करावा, असा निर्णय नांदेडच्या बैठकीत सकल लिंगायत समाजाने घेतला आहे.
राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून दोन तुकडे केल्याप्रमाणे आता लिंगायत समाज फोडून आठरा पगड पोटजातीमध्ये दरी पाडण्याची कूट नीती भाजपने अवलंबली आहे.हा वेगळा डाव आहे.लिंगायत समाजबांधव हाणून पाडतील असेही डॉ.बसवराज बगले म्हणाले.