युवकांनी सामाजिक दायित्वातून बीडचा विकास साधावा – जिल्हाधिकारी
बीड, दि. २७ प्रतिनिधी : विद्यार्थ्यांची प्रगती केवळ शालेय गुणांवर अवलंबून नसते, तर त्यांची आवड, लक्ष आणि कौशल्य यावर यशाची दिशा ठरते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा. युवकांनी जाती-धर्माच्या भिंती बाजूला ठेवून सामाजिक दायित्वाच्या भावनेतून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने तुलसी महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बोलत होते. कार्यक्रमाला तुलसी शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा युवा अधिकारी सागर उज्जैनकर, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रा. दिनकर थोरात, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारार्थी डॉ. कविता गित्ते, राष्ट्रीय खेळाडू क्षितीजा गव्हाणे आणि प्राचार्य डी. जी. निकाळजे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी युवकांना योग्य दिशा देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. युवकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, तिथे व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थित राहतो. जलसंधारण आणि क्रीडा विभागाच्या उपक्रमांना नेहमी प्राधान्य देतो. कला आणि क्रीडा हे आपल्या आवडीचे विषय असून आजही नियमित खेळ खेळतो. युवकांनी जबाबदारीने वागून गाव आणि शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून बीडमधील युवकांनी आपले कौशल्य सिद्ध करून विभाग आणि राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या युवकांचा गौरव
छत्तीसगडमधील रायपूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वंदे मातरम् कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील युवकांनी महाराष्ट्राचे प्रभावी प्रतिनिधित्व केले होते. सांस्कृतिक, बहुभाषिक आणि सामाजिक विषयांवरील उल्लेखनीय योगदानाबद्दल या युवकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा युवा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या शिष्टमंडळाची निवड करण्यात आली होती.
लावणी आणि नृत्याविष्कारांनी वेधले लक्ष
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तुलसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता जाधव हिने पिकलं जांभूळ तोडू नका या लावणीवर बहारदार सादरीकरण केले. केज येथील साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी आश्रोबा घुले हिने आपल्या चढविला पट्टा कमरेवरी या लावणीद्वारे उपस्थितांची दाद मिळवली. इन्फिनिटी डान्स ग्रुपच्या लल्लाटी भंडार या गाण्यावरील नृत्यानेही विशेष लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले, तर जिल्हा युवा अधिकारी सागर उज्जैनकर यांनी आभार मानले. महोत्सवासाठी प्रा. दीपक जमदाडे, प्रा. संतोष मस्के, विलास सोनवणे, प्रा. पांडुरंग सुतार, प्रा. राम गव्हाणे, डॉ. संजय कांबळे, डॉ. संदीप परदेशी, प्रा. सुमित गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील परीक्षकांनी काम पाहिले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर आणि जिल्हा युवा अधिकारी सागर उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डी. जी. निकाळजे, प्रा. चंद्रशेखर किरवले, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, अनिकेत काळे, क्रीडा मार्गदर्शक सतीश राठोड, रेवननाथ शेलार, जितेंद्र आराक, धनेश करांडे, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच मयूर पाठक आणि दिनकर चर्के यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी आणि युवक युवतींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.