पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पनवेल महापालिकेचा पुढाकार
पनवेल, दि. ६ सप्टेंबर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शाडू मातीच्या मूर्तींचे पर्यावरणीय फायदे, जलप्रदूषण टाळण्याचे उपाय आणि उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली.
कार्यशाळेदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करावा आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे.