रामदास आठवले यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य सत्कार
मुंबई, दि. 15 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीचा आशीर्वाद असल्यामुळेच आपण केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकलो, अशी कृतज्ञ भावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री पदाची दहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल रामदास आठवले यांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात भव्य सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आठवले यांचा सत्कार करण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या युतीमुळे शिवशक्ती आणि भीमशक्तीला एकत्र आणत महायुतीची ताकद वाढली, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रात गेली दहा वर्षे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून आता रिपब्लिकन पक्षाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच लाडकी बहीण योजनेतील महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.
2029 मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. पुढील काळातही केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे कौतुक केले. दलित पँथरच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत संघर्ष करत आठवले पुढे आले. संघर्षाचा मोठा प्रवास असूनही त्यांच्या मनात कोणाबद्दल कटुता नाही. सर्वांशी सुसंवाद साधण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. महायुतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम आठवले यांनी केले, असे फडणवीस म्हणाले.
रामदास आठवले पुढील दहा वर्षेही केंद्रीय मंत्री राहावेत, अशी शुभेच्छाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यांनी आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वातील संघर्ष, समन्वय, नेतृत्व आणि आंबेडकरी विचारांशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रभावी नेतृत्व असल्याचे सांगितले. गेली दहा वर्षे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी वंचित आणि गरजू घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी काम केले, असे शिंदे म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आठवले यांनी मंत्री म्हणूनच नव्हे तर तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे लोकनेते म्हणून देशभरात स्वतंत्र ठसा उमटवला असल्याचे सांगितले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सलग दहा वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात प्रभावीपणे काम करणे ही मोठी कामगिरी असल्याचे सांगत आठवले यांच्या कार्याचे कौतुक केले.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी रामदास आठवले यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आंबेडकरी विचार आणि सामाजिक समतेचा संदेश देशभर पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आठवले हे आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व असल्याचे सांगितले. दलित पँथर चळवळीपासून लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे दरेकर म्हणाले.