राहुरीतील अफरोज शेख यांची PSI पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीचा प्रेरणादायी प्रवास!
राहुरी (प्रतिनिधी):
राहुरी शहरातील खुरपे मळा येथील सर्वसामान्य कुटुंबातील अफरोज सजन शेख या तरुणाने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घालत यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. नुकतीच त्यांची PSI अधिकारी म्हणून निवड झाली असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
सध्या पुणे येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अफरोज शेख हे मेहनती, ध्येयवादी आणि जिद्दी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश संपादन करत आपले स्थान निर्माण केले आहे.
लहानपणापासूनच PSI होण्याचे स्वप्न मनात बाळगलेल्या अफरोज यांनी अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य केले. विशेष म्हणजे, सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांना एकाच दिवशी मंत्रालयासह तीन सरकारी नोकऱ्यांची संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले आणि प्रतिष्ठेचे PSI पद निवडले.
अफरोज यांचे वडील सजन शेख हे राहुरीतील इदगाह मैदान, खुरपे मळा येथे वास्तव्यास असून उदरनिर्वाहासाठी जुने बसस्टॉप परिसरातील गॅरेज लाईनमध्ये काम करतात. मोठे बंधू स्वर्गीय फिरोज शेख हे स्लाइडिंग विंडो व्यवसायात कार्यरत होते. कुटुंबात आई, दोन बहिणी, पत्नी आणि दोन लहान मुले असा मोठा परिवार आहे.
साध्या कुटुंबातून आलेल्या अफरोज यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच हे यश मिळवले आहे.
“यश सहज मिळत नाही; त्यासाठी प्रामाणिक मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे,” हा त्यांचा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अफरोज शेख यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी दिशादर्शक ठरत असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.