वडाळे तलावावर रंगली सुरेल दिवाळी पहाट

वडाळे तलावावर रंगली सुरेल दिवाळी पहाट
वडाळे तलावावर रंगली सुरेल दिवाळी पहाट

पनवेल, दि. ९ : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट २०२६ या सांस्कृतिक कार्यक्रमाला वडाळे तलाव परिसरात हजारो रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुरेल गायनाने आणि कवी वैभव जोशी यांच्या आशयघन काव्यरचनांनी पहाटेचा सोहळा संस्मरणीय ठरला.

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी पहाटे पार पडलेल्या या कार्यक्रमात संगीत आणि साहित्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या सांस्कृतिक परंपरेला यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

गायिका प्रियांका बर्वे यांनी मराठी, हिंदी आणि भक्तिगीतांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तुझं मागतो मी आता, केव्हा तरी पहाटे, इन आँखों की मस्ती में, तुझे चाँद के बहाने देखूँ, मी तर स्वामिनी तुझी, मी डोलकर डोलकर आणि कानडा राजा पंढरीचा यांसारख्या लोकप्रिय गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कवी आणि गीतकार वैभव जोशी यांनी आयुष्य, निसर्ग, संस्कृती आणि भक्ती अशा विविध विषयांवरील कविता सादर केल्या. त्यांच्या भावस्पर्शी आणि विचारप्रवर्तक काव्यरचनांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला साहित्यिक समृद्धी लाभली.

या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले. परेश ठाकूर यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार आणि रसिकांचे आभार मानले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संगीत, कविता आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर अनुभव देणारा हा सोहळा पनवेलकरांसाठी दिवाळीतील अविस्मरणीय पर्व ठरला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नवव्या वर्षातील दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.