विकसित महाराष्ट्रासाठी व्यापक दृष्टिकोन आवश्यक

विकसित महाराष्ट्रासाठी व्यापक दृष्टिकोन आवश्यक

मुंबई, दि. १२ : विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून समन्वयाने व जबाबदारी स्वीकारून काम करावे. बदलत्या काळानुसार नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करावे, असे आवाहन महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित फ्रॉम फाईल्स टू फ्यूचर या प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण महाजन, अपर मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी शिवाजी पाटील, सहसचिव संपत सूर्यवंशी, भगवान सावंत, सत्यनारायण बजाज, कैलास गायकवाड, संजय बनकर, श्रीराम यादव, मनीषा जायभाये, उपसचिव अश्विनी यमगर, गौरी म्हस्के यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट क्षमता असते. त्यामुळे इतरांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःची क्षमता ओळखून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. प्रशासकीय कामकाजात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःहून जबाबदारी स्वीकारल्यास अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर नेतृत्वगुण विकसित होऊन विश्वासार्हता निर्माण होते आणि परिवर्तन घडविण्याची संधी मिळते, असे खारगे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी स्वतःला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी शासनाच्या निःशुल्क आयगॉट प्रशिक्षण व्यासपीठावरील अभ्यासक्रमांचा नियमित लाभ घ्यावा. वाचन, श्रवण आणि दृक्‌माध्यमांच्या माध्यमातून सातत्याने शिकण्याची सवय लावावी. तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास प्रशासकीय कामकाजात गती, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होते. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध शासकीय विभाग, संबंधित व्यक्ती आणि संस्थांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. विकसित राष्ट्रांमध्ये निश्चित कार्यपद्धती आणि सक्षम व्यवस्था यांना महत्त्व दिले जाते. व्यक्ती बदलत असल्या तरी प्रशासकीय यंत्रणा सक्षम आणि कार्यक्षम राहणे आवश्यक आहे. या दृष्टीने महसूल विभागात आवश्यक बदल घडविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे खारगे यांनी कौतुक केले.

महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, समाजपरिवर्तन आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन संवेदनशीलतेने काम करावे. प्रत्येक प्रशासकीय निर्णय आणि कामातून समाजाला होणारा लाभ लक्षात घेऊन विकसित महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन खारगे यांनी केले.