शासकीय सेवांसाठी उल्हासनगरात विशेष शिबिर
उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचे विशेष शिबिर घेण्यात आले. विठ्ठलवाडी येथील गोपाळ समाज मंदिरात झालेल्या या शिबिराला भटक्या व विमुक्त जमातीतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिरात ५१४ नागरिकांना विविध शासकीय दाखले, आरोग्य सुविधा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये १२९ नागरिकांना जातीचे दाखले, २२ जणांना अधिवास दाखले, १२ जणांना रहिवास दाखले, सहा जणांना उत्पन्नाचे दाखले, आठ जणांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आणि तीन जणांना वयाचे दाखले वितरित करण्यात आले.
महसूल विभागाशी संबंधित नमुना सहा, सात आणि आठची ४० कामे पूर्ण करण्यात आली. तसेच ७० नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड आणि ८० नागरिकांना आभा कार्ड देण्यात आले. १५ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
शिधावाटप कार्यालयामार्फत २३ नागरिकांना सेवा देण्यात आली. संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत चार नागरिकांना लाभ मिळाला, तर १६ नागरिकांची आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ८६ नागरिकांना शासकीय कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसीलदार कल्याणी कदम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. महसूल, सेतू केंद्र, आरोग्य आणि पुरवठा विभागाच्या समन्वयातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध झाल्या.