ठाणे शहराच्या पर्यावरण संवर्धनासह महसूल वाढीसाठी महापालिकेचा कृती आराखडा
ठाणे महानगरपालिकेने शहरातील पर्यावरण संवर्धन, वायू प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता व्यवस्था आणि महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी तयार केलेल्या व्यापक कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली नागरी संशोधन केंद्र येथे महापालिकेच्या विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त, सहायक आयुक्त, उपनगर अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
शहरातील पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी केवळ पर्यावरण विभागापुरती मर्यादित नसून सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेली कामे निश्चित वेळेत पूर्ण करून न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बांधकामस्थळांवरील धूळ प्रदूषणाला आळा
बांधकामस्थळांमुळे होणारे धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी टायर वॉशिंगची सुविधा सुरू ठेवणे, नियमित पाणी फवारणी करणे आणि हिरव्या जाळ्यांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही याची नियमित तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाला गती
बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्या. प्रभागांमध्ये घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्याबरोबरच स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.
हरित क्षेत्राच्या विस्तारावर भर
वृक्ष प्राधिकरण, उद्यान विभाग आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे काम करून वृक्षसंवर्धन, खुल्या जागांचे संरक्षण आणि नव्या हरित क्षेत्रांची निर्मिती करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी विशेष नियोजन
गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात स्वच्छता, वाहतूक, कचरा संकलन, ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रण तसेच आवश्यक फांद्या छाटणीसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
घोडबंदर रोडवरील डेब्रीज हटविण्याचे आदेश
घोडबंदर रोडवरील मेट्रो प्रकल्पाच्या कामातून निर्माण झालेले डेब्रीज आणि वापरात नसलेली यंत्रसामग्री रस्त्यालगत पडून राहू नये यासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी विकासकांवर नोटीस आणि दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले.
धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण
शहरातील धोकादायक इमारतींचे सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी आणि आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम
महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, एसआरए प्रकल्प, एमआयडीसी तसेच इतर महसुली स्रोतांमधून उत्पन्न वाढविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले.