सोनई फाट्यावर ‘जय-वीरू’चा सुळसुळाट; वाहनचालकांकडून अवैध वसुलीचा आरोप

सोनई फाट्यावर ‘जय-वीरू’चा सुळसुळाट; वाहनचालकांकडून अवैध वसुलीचा आरोप

राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी खुर्द परिसरातील सोनई फाटा येथे वाहनचालकांकडून अवैधरित्या पैसे उकळले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी वेळोवेळी थांबत असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांच्या अनुपस्थितीतही दोन अनाधिकृत व्यक्ती तेथे थांबून स्वतःला पोलीस असल्याचे भासवत वाहनधारकांकडून पैसे गोळा करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या परराज्यातील वाहनांना अडवून कागदपत्रांची तपासणी करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करतात. विशेषतः शनि शिंगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांनाही लक्ष्य केले जात असून, त्यांना दंडाची भीती दाखवून जादा रक्कम उकळली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. स्थानिक पातळीवर या दोघांना ‘जय-वीरू’ अशी उपमा दिली जात असून, पोलीस कर्मचारी उपस्थित नसतानाही ते निर्भयपणे या ठिकाणी वावरत असल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या अवैध वसुलीतून गोळा होणाऱ्या पैशांची वाटणी काही पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत होत असल्याची चर्चा परिसरात रंगत असली, तरी या बाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र अशा चर्चेमुळे राहुरी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकारामुळे नागरिक व प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून, संबंधित अनधिकृत व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी राहुरी पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात येत आहे. आता या गंभीर प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.