पनवेल मनपाचा दशकपूर्ती महोत्सव
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान दशकपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध समाजघटकांना सहभागी करून विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाची सुरुवात १ ऑक्टोबर रोजी होणार असून महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अभ्यागतांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तसेच महापालिका मुख्यालयासह कार्यक्षेत्रातील पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
दशकपूर्ती महोत्सवात मुख्य सोहळ्यासह पनवेल महापालिकेच्या दहा वर्षांच्या वाटचालीवर आधारित विकास प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महिला, युवा, विद्यार्थी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार, गृहनिर्माण संस्था यांच्यासह विविध घटकांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महापौर चषक सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धा, राष्ट्रीय शाहिरी स्पर्धा, मराठी नाट्य महोत्सव, जनरेशन झेड रील्स स्पर्धा, दशकपूर्ती व्याख्यानमाला, नशामुक्ती वॉकेथॉन आणि आपुलकी मेळावा असे विविध उपक्रम होणार आहेत. विजेत्यांचा गौरव आणि पारितोषिक वितरणाने महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
सेवा संकल्प अभियानाचेही आयोजन
दशकपूर्ती महोत्सवासोबत सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, एकल महिला आणि नागरिकांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या अभियानात आरोग्य तपासणी, महिला आरोग्य, रक्तदान, अवयवदान संकल्प, स्वच्छता, कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, मतदार नोंदणी, वृक्षारोपण, डिजिटल साक्षरता, सायबर फसवणूक जनजागृती, सैनिकांचा सन्मान, रस्ते सुरक्षा, व्यसनमुक्ती, योग आणि ध्यान सत्र असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
१६ ऑक्टोबर रोजी सेवा संकल्प अभियानाचा सांगता समारंभ होणार असून खुली चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा तसेच माहितीपर बाईक रॅली आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी जनसेवक महाकुंभ हा मुख्य समारोप कार्यक्रम होणार आहे.