सोलापूर झेडपीत युवा मैत्रीचा नवा अध्याय : म्हेत्रेंची माघार, तानवडेंचे गणित जुळले
Ks news प्रतिनिधी संदेश कांबळे सोलापूर
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडीदरम्यान मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दुपारच्या सत्रात झालेल्या घडामोडींमुळे जिल्हा परिषदेत युवा नेत्यांमधील समन्वयाचे नवे चित्र समोर आले.
अक्कलकोट तालुक्यातील सदस्य शिवराज म्हेत्रे आणि प्रवीण तानवडे यांनी स्थायी, बांधकाम आणि समाज कल्याण समितीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अक्कलकोटमधील सत्ता संघर्ष झेडपी सभागृहात पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र शिवराज म्हेत्रे यांनी आपले मित्र माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांच्यासाठी स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.
या निर्णयामुळे राजकीय स्पर्धेपेक्षा मैत्रीला प्राधान्य देत युवा नेतृत्वाने समन्वयाची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रवीण तानवडे यांनीही परिस्थिती न ताणता समाज कल्याण व बांधकाम समिती सदस्य निवडणुकीतून माघार घेतल्याचे समजते.
या समन्वयानंतर शिवराज म्हेत्रे यांना शिक्षण व कृषी समितीची जबाबदारी देण्यात आली असून प्रवीण तानवडे यांची अर्थ समितीत निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तानवडे यांनी आपले राजकीय आणि आर्थिक गणित अचूक जुळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, दुपारची सर्वसाधारण सभा सदस्यांचा कोरम पूर्ण न झाल्यामुळे तहकूब करण्यात आली असून ती दुपारी साडेतीन वाजता पुन्हा घेण्यात येणार असल्याचे कळते.