हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, १३ ऑगस्ट : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी सुसज्ज असलेल्या या अतिथीगृहामुळे राज्याच्या आदरातिथ्य व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.
या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार, मुख्य सचिव आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हायमाऊंट राज्य अतिथीगृहामध्ये एकूण ५७ सुसज्ज कक्ष असून त्यात ६ व्हीव्हीआयपी आणि ५१ इतर कक्षांचा समावेश आहे. तळमजला आणि आठ मजल्यांची ही इमारत आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि उच्च दर्जाच्या आदरातिथ्याचा विचार करून उभारण्यात आली आहे.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यवरांसह अतिथीगृहाची पाहणी करून विविध सुविधांची माहिती घेतली. देश-विदेशातून राज्यात येणाऱ्या मान्यवरांना दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हे अतिथीगृह महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.