केएलई महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती

केएलई महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती
केएलई महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून केएलई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्व, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान तसेच मूर्ती विसर्जनाचा जलस्रोतांवर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे आणि केएलई महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. विजय डी. मेंढुळकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या.

कार्यशाळेच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि निसर्ग संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती निर्माण करून हा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.