गंगाधाम चौकात टेकडी फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर केल्याचा आरोप
पुणे, दि. २९ : पुण्यातील गंगाधाम चौक परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीच्या मागील बाजूस बांधकाम प्रकल्पासाठी टेकडी फोडण्याचे काम सुरू असून, यासाठी स्फोटकांचा वापर केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खोदकाम सुरू असल्याचा दावा रहिवाशांनी केला असून, या कामामुळे परिसरातील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आनंदनगर झोपडपट्टीच्या मागील बाजूस रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे. टेकडी फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर होत असल्याने वस्तीतील घरांना धोका निर्माण होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वस्तीच्या अगदी जवळ सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
या खोदकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, स्फोटकांच्या वापरास अधिकृत मान्यता आहे का आणि संबंधित सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे महानगरपालिका, गौण खनिज विभाग आणि स्फोटकांच्या वापरावर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे काम थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आनंदनगर झोपडपट्टीतील कुटुंबांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
विकासकामांना विरोध नसून नागरिकांच्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे रहिवाशांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात संबंधित प्रशासन काय भूमिका घेते आणि खोदकामाबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.