ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाची मोठी हानी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाची मोठी हानी
मुंबई, दि. ८ : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी, मराठी रंगभूमी आणि समाजकारण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाना पाटेकर हे केवळ उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयातील अस्सलपणा आणि सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत त्यांनी आपल्या सहज, प्रभावी आणि दमदार अभिनयाने अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. नटसम्राट, क्रांतिवीर आणि परिंदा यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवला. त्यांचा अभिनय रसिकांच्या मनात सदैव स्मरणात राहील, असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.
नाना पाटेकर यांचे दिवंगत अजितदादा पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. कौटुंबिक सुखदुःखाच्या प्रसंगी ते नेहमी पवार कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत असत. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही आपल्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी वैयक्तिक दुःख असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
अभिनय क्षेत्रात मोठे यश मिळवूनही नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त, शेतकरी आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कलेसोबतच सामाजिक सेवेचा ध्यास घेणाऱ्या या अष्टपैलू कलाकाराचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.