ठाणे जिल्ह्यात महा श्रमदान दिन उत्साहात

ठाणे जिल्ह्यात महा श्रमदान दिन उत्साहात
ठाणे जिल्ह्यात महा श्रमदान दिन उत्साहात
ठाणे जिल्ह्यात महा श्रमदान दिन उत्साहात
ठाणे जिल्ह्यात महा श्रमदान दिन उत्साहात

ठाणे, दि. १ : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी महा श्रमदान दिन उत्साहात राबविण्यात आला. भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीत संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता उपक्रमांना सुरुवात करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिकाने ती दैनंदिन जबाबदारी म्हणून स्वीकारावी, असा संदेश देण्यात आला.

महा श्रमदान दिनानिमित्त ग्रामपंचायत परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावाच्या स्वच्छतेसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सेवा सन्मानही करण्यात आला. यासोबतच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, परिसर साफसफाई आणि वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंडित राठोड, भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी राजू भोसले यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्या, नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्येही महा श्रमदान दिनानिमित्त सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, शाळा परिसर आणि पाणीपुरवठा स्रोत परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या भावनेतून नागरिकांनी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गाव निर्मितीचा संकल्प केला. स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून सातत्याने जपण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश अभियानातून देण्यात आला.