ठाण्यात १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
ठाणे, दि. ९ : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शिक्षक हा विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणारा नसून त्यांना विचार करणे, स्वप्ने पाहणे आणि अडचणींवर मात करणे शिकवणारा मार्गदर्शक आहे, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.
प्रा. अशोक बागवे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करून त्यांना नव्या विचारांची दिशा देण्याचे आवाहन शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांची भाषा, परिस्थिती आणि क्षमता समजून घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिका शाळांमध्ये विविध शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबविले जात असून यंदा १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. महापालिकेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ८६ टक्के लागल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.