दहा दिवसांच्या गणरायाला पनवेलमध्ये भावपूर्ण निरोप

दहा दिवसांच्या गणरायाला पनवेलमध्ये भावपूर्ण निरोप
दहा दिवसांच्या गणरायाला पनवेलमध्ये भावपूर्ण निरोप
दहा दिवसांच्या गणरायाला पनवेलमध्ये भावपूर्ण निरोप

पनवेल, दि. 26 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर आणि नावडे परिसरात दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात शांततेत विसर्जन करण्यात आले. यावेळी एकूण 6 हजार 973 घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

माझी वसुंधरा 7.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा ही मोहीम राबविण्यात आली. महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशभक्तांसाठी विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून यंदा 106 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये 77 नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि 29 कृत्रिम तलावांचा समावेश होता. या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही, स्टेज, टॉवर, टेबल खुर्च्या, लाऊडस्पीकर, निर्माल्य कलश आणि लाइफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती बबन मुकादम आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी विविध विसर्जनस्थळांना भेटी देऊन पाहणी केली. आयुक्त मंगेश चितळे यांनीही विविध ठिकाणी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे कर्मचारी विसर्जनस्थळी पूर्णवेळ उपस्थित होते. अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग तसेच पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक विसर्जनस्थळी प्राथमिक उपचाराची वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.