दुष्काळी उपाययोजनांना गती देण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगाव, दि. २६ : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. जल जीवन मिशनसह ग्रामीण भागातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे महिनाभरात पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्ह्यात एक लाख जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव आणि धरणगाव तालुक्यांतील विविध विभागांची प्रशासकीय आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. महावितरणने ट्रान्सफॉर्मर, केबल, फ्यूज आणि वीजपुरवठ्यातील बिघाड तातडीने दूर करण्यासाठी चोवीस तास आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवावी. पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक वीजजोडण्यांबाबत महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
कानळदा किनोद आणि आव्हाणी भोकणीदरम्यान नवीन वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करून घेण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले.
जलसंधारण विभागाने अपूर्ण बंधारे, नाला खोलीकरण आणि पाझर तलावांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीलाही प्राधान्य द्यावे. शासनाच्या जलतारा योजनेअंतर्गत जिल्ह्याला ५८ हजार जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट असले, तरी संभाव्य दुष्काळाचा विचार करून हे उद्दिष्ट एक लाखापर्यंत नेण्याचे नियोजन करावे, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने चारा लागवड आणि उपलब्धतेचे नियोजन करावे. शाळा व अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे. ग्रामपंचायतींसह सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांमधून महिनाभरात प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. कामांमध्ये दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. लघुसिंचनाची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पीकविम्याची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला प्रांताधिकारी योगेश कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी आणि शीतल राजपूत, गटविकास अधिकारी सागर कोल्हे आणि चंद्रकांत बोडरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित विभागप्रमुखांनी सुरू असलेल्या विकासकामांचा, प्रलंबित कामांचा आणि अडचणींचा आढावा सादर केला.
विशेष प्रतिनिधी सौ. रूपाली मनोज बैसाने
KS NEWS