पनवेलमध्ये ११ हजार २८० गौरी गणपतींचे शांततेत विसर्जन

पनवेलमध्ये ११ हजार २८० गौरी गणपतींचे शांततेत विसर्जन
पनवेलमध्ये ११ हजार २८० गौरी गणपतींचे शांततेत विसर्जन

पनवेल, दि. २० : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागांसह नावडे उपविभागात सुमारे ११ हजार २८० घरगुती गौरी गणपती तसेच सार्वजनिक गणपतींचे भक्तिमय वातावरणात नियोजनबद्ध आणि शांततेत विसर्जन करण्यात आले.

माझी वसुंधरा ७.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा ही मोहीम राबविण्यात आली. महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशभक्तांसाठी विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने यंदा एकूण १०६ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि ७७ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही, स्टेज, टॉवर, टेबल खुर्च्या, लाऊडस्पीकर, निर्माल्य कलश आणि लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती.

विसर्जनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने काम केले. प्रभाग सभापती आणि महापालिका सदस्यांनी आपापल्या प्रभागातील विसर्जन स्थळांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. आयुक्त मंगेश चितळे यांनीही विविध विसर्जन स्थळांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.

अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त अभिषेक पराडकर, शहर अभियंता राजेश कर्डिले, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर तसेच चारही प्रभाग अधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विसर्जन स्थळांवर उपस्थित राहून व्यवस्थापन केले.

विसर्जन घाटांवर अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच पोलिस विभागाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक विसर्जन स्थळी वैद्यकीय पथकांकडून प्राथमिक उपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या नागरिकांचा सन्मान

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.