पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला इचलकरंजीत मंडळांचा प्रतिसाद

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला इचलकरंजीत मंडळांचा प्रतिसाद
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला इचलकरंजीत मंडळांचा प्रतिसाद
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला इचलकरंजीत मंडळांचा प्रतिसाद

इचलकरंजी, दि. २६ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहापूर खणीत १५४ सार्वजनिक आणि २४५ घरगुती अशा एकूण ३९९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नदीघाट येथील कृत्रिम विसर्जन कुंडात ३३ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे २५ सप्टेंबर रोजी एकूण ४३२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या वतीने शहापूर खण येथे तीन विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शहापूर हायस्कूलमागील विसर्जन स्थळ, ओपन जिमजवळील विसर्जन स्थळ आणि बालाजीनगर येथील पद्मा पॅलेससमोरील विसर्जन स्थळी क्रेनसह आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली होती.

विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेचे २५० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. तसेच पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू पथके आणि स्थानिक पोहणाऱ्या स्वयंसेवकांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

विसर्जनस्थळी सुरक्षेसाठी तीन यांत्रिक बोटी, तीन क्रेन, एक अग्निशमन वाहन आणि चार रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. महानगरपालिका प्रशासन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या समन्वयातून विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या देखरेखीखाली संपूर्ण विसर्जन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या संस्था, महानगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी आभार मानले. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात यापुढेही नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.